ना . मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतले शिबिर
देवगड : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देवगड-जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्रमांक १ मधील तरवाडी, पीरवाडी व कावलेवाडी येथील नागरिकांसाठी आयोजित या शिबिराचा एकूण ८५ जणांनी लाभ घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्र इळये व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कडत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, मधुमेह तपासणी, ईसीजी, हिमोग्लोबिन, कॅल्शियम, सीबीसी, किडनी फंक्शन टेस्ट (KFT) तसेच लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT) आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली.
या शिबिरासाठी माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर व भाजप शहराध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी विशेष पुढाकार घेतला होता. तसेच भाजप बूथ क्रमांक ६५ मधील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तरवाडी-पीरवाडी-कावलेवाडी मित्रमंडळ यांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून अजित गोगटे, बाळ खडपे, राजा भूजबळ, योगेश चांदोस्कर, दया पाटील, ज्ञानेश्वर खवळे, बापू जुवाटकर, सुभाष धुरी, हरिदास कांदळकर, मोहन शेटगे आणि संजय कावले उपस्थित होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले असून अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.













