शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा : सभापती सिध्देश रावराणे

करुळच्या शैक्षणिक विकासाचे काम प्रेरणादायी 

करुळ गावठण अ येथील अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 

वैभववाडी l प्रतिनिधी :    गावातील शाळांच्या शैक्षणिक प्रगतीकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. ती प्रत्येक नागरिकाची बांधिलकी आहे. करुळ मधील प्राथमिक शाळांचा कायापालट स्थानिक ग्रामस्थ्यांनी लोकसहभागातून केला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा लोकसहभागातून उपलब्ध करून दिल्या आहेत. ही निश्चित अभिमानाची बाब आहे. शासनाकडून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. याची काळजी शासन, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ घेत आहेत. सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी प्रगती साधली पाहिजे. असे प्रतिपादन वैभववाडी पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी केले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करूळ गावठण अ येथे अंगणवाडी केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सभापती सिद्धेश रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, उपसभापती साची कोलते, चेअरमन दिगंबर पाटील, बाळा कदम, उपसरपंच भास्कर सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कोलते, प्रकल्प अधिकारी श्रीमती काकडे, श्रीमती सकपाळ, रमेश पांचाळ, प्रकाश सावंत, मंगेश घाडी, रोहिणी लाड, माधवी राऊत, संध्या शिवगण व पदाधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सिद्धेश रावराणे म्हणाले, बचत गटासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात योजना येत आहेत. या गावातील महिलांनी रोजगार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. व्यवसाय उभारणाऱ्या सर्व महिलांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. या गावात मोठ्या प्रमाणात शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उठाव, लोकसहभाग होत आहे. हे निश्चित प्रेरणादायी काम आहे. याचा आदर्श ही इतर शाळांनी घेतला पाहिजे असे सांगितले. दिगंबर पाटील, नरेंद्र कोलते, साची कोलते, बाळा कदम, बाळासाहेब कोलते, रोहीणी लाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पुरोहित अक्षय कानिटकर यांच्या उपस्थितीत गणेश पूजन पार पडले. अंगणवाडी चे काम कमी वेळेत व दर्जेदार केल्याबद्दल सिद्धेश कोलते, सचिन कोलते व सुशांत कोलते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सिद्धेश कोलते यांनी मानले.