भारतीय सैन्यात देशसेवेसाठी सज्ज; पडेल गावचा सुपुत्र प्रथमेश पवारचे जल्लोषात स्वागत

देवगड : देवगड तालुक्यातील पडेल गावचा सुपुत्र प्रथमेश धनाजी पवार याची भारतीय सैन्यात निवड झाल्यानंतर त्याने सहा महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतलेल्या प्रथमेशचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले.

यावेळी गावातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत प्रथमेशचे स्वागत करण्यात आले. गावातील तरुणांसाठी प्रथमेश पवार प्रेरणास्थान ठरत असून त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रथमेशच्या या यशामुळे पडेल गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामस्थांनी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. भारतीय सैन्यात सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल प्रथमेश आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथमेश पवार याची पुढील नियुक्ती राजस्थान येथे होणार असून तो लवकरच देशसेवेसाठी रवाना होणार आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.