वडाचापाट ग्रामपंचायत येथे एकल महिला दिन साजरा
मसुरे | झुंजार पेडणेकर
शासनाने समाजातील विधवा-एकल महिलांसाठी विविध योजना-सोई सवलती जाहीर केल्या आहेत. या सोई सवलतीचा महिलांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत संपर्क साधून लाभ घ्यावा.एकल-विधवा महिलांनी पुढील आयुष्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती परब यांनी वडाचापाट येथे केले.
ग्रामपंचायत वडाचापाट यांच्या वतीने वडाचापाट गावातील विधवा-परित्यक्ता, एकल महिला यांना निमंत्रित करून एकल महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी वडाचापाट सरपंच सोनिया दयानंद प्रभूदेसाई, उपसरपंच सचीन पाताडे, डॉ. भक्ती परब, ग्रा. पं. सदस्या वेदीका माळकर, दर्शना कासले, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, युवा सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दयानंद प्रभुदेसाई, ग्रा. सदस्य विनायक प्रभुदेसाई, श्रीकांत पाटकर, निलेश कासले, रामचंद्र कासले, अंगणवाडी सेविका अनिता पालव, पूर्वा पाटकर, शर्मिला पालव, अंगणवाडी मदतनीस रीना पालव, बचतगटाच्या सीआरपी भक्ती पालव व वडाचापाट गावातील विधवा महिला, एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यानी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच सौ सोनिया प्रभुदेसाई म्हणाल्या, आपल्या गावातील प्रत्येक एकल भगिनीला सन्मानाने जगता यावे यासाठी आमचे ग्रामपंचायत प्रशासन कटिबद्ध आहे.
शासनाच्या विविध योजना, घरकुल योजना आणि इतर सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ आपल्या गावातील प्रत्येक गरजू आणि एकल महिलेपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. तुम्हाला कधीही कोणतीही अडचण भासल्यास, तुमच्या पाठीशी तुमची ही सखी आणि संपूर्ण ग्रामपंचायत खंबीरपणे उभी आहे. ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर यांनीही गावातील महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन शासनाच्या विधवा एकल महिलांना प्राधान्याने योजना राबवून महिलांचे जीवनमान उंचावण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. एकल महिला दिनानिमित्त स्थानिक महिलांना काजू वृक्षांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर यांनी केले.











