दोडामार्ग:सुहास देसाई
दोडामार्ग येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीनंतर आता अखेर बहुप्रतिक्षित पदनिर्मितीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे दोडामार्ग परिसरातील जनतेला भक्कम आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग आता पूर्णपणे खुला झाला आहे. या रुग्णालयासाठी एकूण २० नवीन पदांची निर्मिती करण्यात आली असून, यात तज्ज्ञ डॉक्टरांपासून ते इतर आवश्यक कर्मचाऱ्यांचा (स्टाफ) समावेश आहे. राज्यात मंजूर झालेल्या एकूण १२ उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दोडामार्गचा समावेश करण्यात आला आहे.
या महत्त्वपूर्ण कामासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती उपसभापती तथा शिवसेना तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांनी दिली. तसेच या सर्वांचे दोडामार्गवासीयांच्या वतीने त्यांनी आभार मानले आहेत.
काही दिवसांपूर्वीच आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग येथे येऊन आरोग्य सेवेचा प्रत्यक्ष ‘स्पॉट आढावा’ घेतला होता. त्यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली. उपजिल्हा रुग्णालयाची भव्य इमारत उभी राहिली असली तरी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांअभावी आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता एकाच वेळी २० पदांची निर्मिती झाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी इतरत्र धाव घ्यावी लागणार नाही. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि पुरेसा स्टाफ लवकरच रुग्णालयात दाखल होणार असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.













