आंबा-काजू नुकसानभरपाईचा दुसरा टप्पा वाढीव; शेतकरी समाधानी राहतील – पालकमंत्री

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी हवामानामुळे आंबा व काजू बागांचे ९० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शासनाला दिली असून, त्यानुसार नुकसानभरपाईचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, ही केवळ प्रारंभिक मदत असून पुढील टप्प्यात वाढीव नुकसानभरपाई दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तसेच विधानसभेत या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार निलेश राणे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनीही आंबा व काजू बागायतदारांना अधिक मदत देण्याची मागणी केली होती.

शासनाने जाहीर केलेली सध्याची मदत ही एनडीआरएफच्या निकषांनुसार असून, पुढील टप्प्यात त्यामध्ये वाढ केली जाईल. आंबा व काजू बागायतदार कधीही हात पसरवणारे नाहीत; मात्र यंदा हवामानामुळे अभूतपूर्व नुकसान झाले असून बाजारात आंबाही दिसत नसल्याची खंत पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

“आंबा व काजू बागायतदार शेतकरी समाधानी राहतील, अशा पद्धतीची वाढीव मदत देवाभाऊंचे सरकार निश्चितपणे करेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.