गोवा बनावटीच्या दारूसह ११.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त; सावंतवाडीचे दोघे ताब्यात

 

बांदा : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) रविवारी पहाटे बांदा पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत गोवा बनावटीची दारू व चारचाकी वाहनासह तब्बल ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास बांदा येथील खालसा पंजाबी ढाबा परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत अनिश मंदार पांगम (वय २७, रा. जुना बाजार, सावंतवाडी) आणि अजित बाळकृष्ण मठकर (वय ३९, रा. सावंतवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.

छाप्यामध्ये २ लाख ७३ हजार ८४० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू तसेच ९ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी असा एकूण ११ लाख ७३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ), (ई), ८१ व ८३ अन्वये बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड व पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांनी केली.

दारूबंदीविरोधातील कारवायांमध्ये सिंधुदुर्ग पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी बजावत अवैध मद्य वाहतुकीवर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.