बांदा : प्रतिनिधी 
बांदा शहरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील बांदा सोसायटीसमोर उभ्या असलेल्या एका टेम्पोखाली मगरीचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ओहोळाला आलेल्या पाण्याच्या तीव्र प्रवाहाबरोबर हे मगरीचे पिल्लू थेट रस्त्यावर आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत या मगरीच्या पिल्लाला सुखरूप पकडले आणि तात्काळ वनविभागाच्या ताब्यात दिले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षितस्थळी हलवले असून त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
बांदा शहराच्या जवळून वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रात मगरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गेले दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मुसळधार पावसात मगरी नदीपात्राबाहेर पडून मानवी वस्तीत शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
आज घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीकाठच्या आणि ओहोळाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.













