भाईसाहेब सावंत विद्यालयाला जि. प. सदस्य विक्रांत सावंत व पं. स. सदस्य जितेंद्र गावकर यांच्याकडून इन्व्हर्टर भेट

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

​सावंतवाडी :

नियमित सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेले जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत आणि पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी आपल्या दातृत्वातून येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाला स्वखर्चाने इन्व्हर्टर भेट दिला आहे. या इन्व्हर्टरचा नुकताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयात शुभारंभ करण्यात आला.

​भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात पावसाळ्यात तसेच इतर वेळीही वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोठ्या विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोय होत होती. ही गंभीर समस्या संस्थाचालकांनी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत आणि पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात विजेमुळे कोणतीही अडचण येऊ नये, हा उदात्त हेतू समोर ठेवून या दोन्ही लोकप्रतिनिधींनी तात्काळ दखल घेत स्वखर्चातून विद्यालयाला इन्व्हर्टर उपलब्ध करून दिला.

​याच कार्यक्रमादरम्यान विद्यालयातून इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या हस्ते विशेष गुणगौरव व सत्कार करण्यात आला.

​लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि दातृत्वाबद्दल विद्यालयाचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक वर्ग आणि सर्वच विद्यार्थ्यांमधून कमालीचा आनंद व्यक्त होत असून, दोन्ही लोकप्रतिनिधींचे विशेष आभार मानले जात आहेत.