रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण
सावंतवाडी । प्रतिनिधी : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर या संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा संस्था अध्यक्ष महेश खानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सोमवार दि. २८ जून रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या सुरुवातीस कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले व सरत्या वर्षातील ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांचा आणि प्रगतीचा अहवाल मांडला. यावेळी वाचन मंदिराचे पहिले अध्यक्ष दिवंगत सूर्यकांत सावळाराम मळगांवकर यांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
*डिजिटल नोटीस व रौप्य महोत्सव ठरावांना मंजुरी*
संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ते विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत यापुढील वार्षिक सभेची सूचना सर्व सभासदांना डिजिटल माध्यमातून पाठविण्याच्या ठरावासही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
*’जिल्ह्यात आदर्श ग्रंथालय’ : मान्यवरांकडून कौतुक*
याप्रसंगी माजी कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, आजीव सभासद प्रा. सुभाष गोवेकर व अँतोन फर्नांडिस यांनी ग्रंथालयाच्या दर्जेदार कामकाजाचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी काही मोलाच्या सूचना केल्या. “हे ग्रंथालय जिल्ह्यात एक आदर्श ग्रंथालय म्हणून कार्यरत असून मळगाव गावाला याचा सार्थ अभिमान आहे,” असे गौरवद्गार मान्यवरांनी यावेळी काढले.
शेवटी सौ. स्नेहा खानोलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेला ग्रंथालयाचे आजीव सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













