– के.ई.एम., टाटा कॅन्सर, वाडियासह प्रमुख रुग्णालय परिसरातील विदारक वास्तव सभागृहात मांडले
– फुटपाथवर झोपणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कायमस्वरूपी निवासव्यवस्थेची गरज
– अतिरिक्त एफएसआय देऊन धर्मशाळा उभारण्याचा प्रस्ताव
– ‘गाडगे बाबांच्या कार्याला साजेसा उपक्रम राबवा’, सरकारला आवाहन
मुंबई : विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी विधान परिषदेत परळ येथील के.ई.एम. रुग्णालय परिसराला ‘हेल्थ कॉरिडॉर’ म्हणून घोषित करण्याची मागणी करत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या हालअपेष्टांचा गंभीर प्रश्न सभागृहात मांडला. या भागात अतिरिक्त एफएसआयचा वापर करून धर्मशाळा उभाराव्यात आणि गरीब रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सन्मानजनक निवासव्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
प्रमोद जठार म्हणाले की, परळ परिसरात के.ई.एम. रुग्णालयासह टाटा कॅन्सर रुग्णालय, वाडिया रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय आणि इतर मोठी आरोग्य संस्थाने आहेत. दररोज राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र, रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक राहण्यासाठी कोणतीही पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना फुटपाथवर रात्र काढावी लागते.
अनेक लहान मुले, गंभीर आजारांवर उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रस्त्यावर झोपावे लागते. काही रुग्णांच्या नाकात व तोंडात वैद्यकीय ट्यूब्स असतानाही त्यांचे कुटुंबीय फुटपाथवर राहण्यास मजबूर असल्याचे विदारक चित्र त्यांनी सभागृहासमोर मांडले.
या समस्येवर केवळ चर्चा न करता ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगत जठार यांनी मुंबईच्या विकास नियंत्रण नियमावली (DCR) अंतर्गत परळ परिसराला ‘हेल्थ कॉरिडॉर’ घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला. ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे त्या परिसराचा कायापालट झाला, त्याच धर्तीवर या भागाचाही नियोजनबद्ध विकास करावा, असे त्यांनी सांगितले.
हेल्थ कॉरिडॉर घोषित केल्यास या परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांना अतिरिक्त एफएसआय उपलब्ध करून देता येईल. त्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर धर्मशाळा व निवाससंकुले उभारता येतील. त्यामुळे गरीब रुग्णांचे नातेवाईक सुरक्षित आणि सन्मानाने राहू शकतील, असे त्यांनी नमूद केले.
शंभर वर्षांपूर्वी यांनी महाराष्ट्रभर गरीब, रंजले-गांजलेल्यांसाठी शेकडो धर्मशाळा उभारल्या होत्या. त्या कार्याचा आदर्श घेऊन सरकारने या हेल्थ कॉरिडॉरमध्ये आधुनिक धर्मशाळा उभाराव्यात. आवश्यक असल्यास त्या धर्मशाळांना गाडगे बाबांचे नाव द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
महानगरपालिकेला आवश्यक निर्देश देऊन हेल्थ कॉरिडॉरची संकल्पना तातडीने राबवावी. त्यामुळे परळ परिसराचा नियोजनबद्ध विकास होईल, रुग्णालयांवरील ताण कमी होईल आणि राज्यासह देशभरातून उपचारासाठी येणाऱ्या हजारो रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली













