बेकायदा दारू वाहतुकी विरोधात पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाया
बांदा : प्रतिनिधी
बांदा चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाया सुरू आहेत. पोलिसांनी आज दुपारी गोवा बनावटीच्या दारूसह एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आज दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास बांदा चेक पोस्ट येथे नेहमीप्रमाणे नाकाबंदी आणि वाहन तपासणी सुरू होती. यादरम्यान तेथून जाणाऱ्या एका बोलेरो पिकअप’ (क्र. MH 07 AJ 5209) गाडीला पोलिसांनी थांबवून तिची झडती घेतली.
या तपासणीदरम्यान गाडीमध्ये पोलिसांना गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचे बॉक्स आढळून आले. या दारूची एकूण किंमत ४ लाख ४७ हजार २४० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अमोल लक्ष्मण चिंदरकर (वय ३५, रा. कलमठ, ता. कणकवली) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कारवाई दरम्यान ४,४७,२४० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि ५ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप जीप असा एकूण ९ लाख ४७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पालकर, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल परब यांनी सहभाग घेतला. कारवाई यशस्वी करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल दादा परब, राजेश गवस आणि राकेश चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.













