खेड,(प्रतिनिधी) : नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात खेड तालुक्यातील साखरोली मोरेवाडी जिल्हा परिषद शाळेने उल्लेखनीय आणि ऐतिहासिक यश संपादन केले आहे. शाळेचा विद्यार्थी प्रणय प्रशांत कांबळे याने जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावत राज्य गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे, राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारा तो रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. दुर्गम ग्रामीण भागातील शाळेच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात शाळेचे कौतुक होत आहे.
प्रणय कांबळे याच्यासह शाळेतील ईश्वरी सत्यवान मेटकर, स्वराज महेश मोरे, अनुश्री विलास पाचाडकर, विनय विनोद पाटील, ध्रुव उमेश मुकनाक आणि अर्णव मनेश तांबे या विद्यार्थ्यांनीही जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेच्या यशात मोलाची भर घातली आहे. एकाच शाळेतील तब्बल सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा अधोरेखित झाला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक राजेश भागणे यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक अनिल यादव आणि शिक्षक कृष्णा गंभीरे व अमोल सकपाळ यांचेही मोलाचे योगदान या यशात राहिले आहे.
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना मार्गदर्शक शिक्षक राजेश भागणे यांनी सांगितले की, नवीन गाव, नवीन शाळा, नवीन पालक आणि नवीन विद्यार्थी अशा परिस्थितीतही सर्वांनी एकजुटीने साथ दिली. विद्यार्थ्यांनी वर्षभर शनिवार-रविवारची सुट्टीही न घेता नियमित सराव केला, तर पालकांनीही मुलांना अभ्यासासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे नियोजन यामुळेच हे यश मिळू शकले. आपल्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
साखरोली मोरेवाडी जिल्हा परिषद शाळेने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशामुळे शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जिल्हाभरातून शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून शाळेचे विशेष कौतुक केले जात आहे.













