१०० टक्के गुण, राज्यात प्रथम क्रमांक; तरीही गुणवंत विद्यार्थ्याला पुरस्काराची प्रतीक्षा

खेड (प्रतिनिधी) : इयत्ता दहावीच्या २०२४-२५ च्या राज्य मंडळाच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. श्रेयस निलेश तांबे याला अद्यापही राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय गुणवत्ता पुरस्कार मिळालेला नसल्याने समाजकल्याण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्यात अव्वल स्थान मिळवूनही पुरस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कु. श्रेयस तांबे याचा पुरस्कारासाठीचा प्रस्ताव संबंधित कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, रत्नागिरी यांनी १३ जानेवारी २०२६ रोजी हा प्रस्ताव प्रादेशिक उपायुक्त, मुंबई विभाग यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र त्यानंतर अनेक महिने उलटूनही प्रस्तावावर नेमकी काय कार्यवाही झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

पुरस्काराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी पालक निलेश तांबे यांनी समाजकल्याण विभाग, प्रादेशिक कार्यालय तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला. यासाठी ई-मेलद्वारे तसेच लेखी पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आला. मात्र आजपर्यंत कोणतेही समाधानकारक किंवा ठोस उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवत्ता पुरस्कार हा शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. अशा परिस्थितीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यालाच पुरस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाच्या उदासीनतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

यासंदर्भात पालक निलेश तांबे यांनी समाजकल्याण आयुक्त, पुणे यांच्याकडे निवेदन सादर केले असून पुरस्कार प्रस्तावाची सद्यस्थिती जाहीर करावी, प्रस्तावावरील कार्यवाहीची माहिती द्यावी, संबंधित नोंदी उपलब्ध करून द्याव्यात तसेच योजना सुरू आहे की स्थगित अथवा बंद करण्यात आली आहे, याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यालाच पुरस्कारासाठी हेलपाटे मारावे लागत असतील तर ही गुणवंत विद्यार्थ्यांची शोकांतिका असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत. पुरस्कार योजना सुरू आहे की नाही, प्रस्ताव नेमका कुठे अडकला आहे आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार, याकडे आता विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.