मांदिवलीत तीन दिवसांपासून रस्त्यावर लोंबकळत विद्युत तारा; मोठ्या दुर्घटनेची भीती, ग्रामस्थांचा महावितरणला इशारा

दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली तालुक्यातील मांदिवली गावात गेल्या तीन दिवसांपासून विद्युत तारा रस्त्यावर धोकादायकरीत्या लोंबकळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झाड कोसळून विद्युत वाहिन्यांचे नुकसान होऊनही अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मांदिवली येथील रामचंद्र जालगावकर यांच्या घरासमोर १ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास एक मोठे आंब्याचे झाड थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळले. झाडाचा संपूर्ण भार विद्युत तारांवर आल्यामुळे काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, तारा झाडाखाली दबलेल्या अवस्थेत असतानाही काही वेळाने पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, घटनेची माहिती त्याच रात्री महावितरणच्या वायरमनला देण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी वीजपुरवठा बंद करून झाड हटविण्यात आले आणि रस्ता मोकळा करण्यात आला. मात्र, विद्युत तारा अद्यापही रस्त्यावर लोंबकळत असून त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. महावितरणकडे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कामाला विलंब होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. दरम्यान, वीजपुरवठा बंद केल्यास परिसरातील चार वाड्यांमधील नागरिक अंधारात राहण्याची वेळ येणार असल्याने वीज सुरू ठेवण्यात आली असून रस्ता मात्र बंद ठेवण्यात आला आहे.
घटनास्थळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून विद्यार्थी, ग्रामस्थ आणि वाहनचालक या मार्गाचा नियमित वापर करतात. त्यामुळे ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून कोणत्याही क्षणी गंभीर अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, घटना घडून तीन दिवस उलटूनही जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निवडणुकीच्या काळात गावोगावी फिरणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी आता या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर महावितरण प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करावी, रस्ता सुरक्षित करावा आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. देव न करो, मात्र एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.