बागायत पुलानाजिक वटवृक्ष कोसळला ; वाहतुकीचा खोळंबा!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण बागायत कणकवली मार्गावरील बागायत पुलानजीक मोठा वटवृक्ष मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास भर रस्त्यात उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून पूर्णपणे बंद झाली आहे. सोमवारी दिवसभर पावसाची संतत धार आणि वादळी वारे चालू होते.रात्री सुद्धा मोठ्या प्रमाणात वाऱ्याने वेग धरला होता. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास बागायत पुला नजीक रस्त्यालगत असलेला हा वटवृक्ष रस्त्यावर पडला. लगतच वीज वितरणची मुख्य लाईन सुद्धा असल्याने या वटवृक्षाच्या फांद्यामुळे त्या ठिकाणी या वीज लाईन तुटून वीज पुरवठा सुद्धा पूर्णपणे खंडित झाला आहे. यामुळे तीन विजेचे पोल वाकले असून वीज वितरणचे कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या मुख्य मार्गावरील वाहतूक बंद राहिल्यामुळे सकाळी वाहतुकीचा मोठा खोळंबा होऊन वाहनांच्या रांगा सुद्धा लागल्या होत्या. सदर मार्गावरती मोठ्या प्रमाणात जुनी झाडे धोकादायक स्थितीत उभी असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडे वेळीच दूर करणे आवश्यक असल्याची मागणी भाऊ भोगले यानी केली आहे.