दापोली भाजपाची महावितरण कार्यालयावर धडक
दापोली(प्रतिनिधी):
दापोलीत महावितरण च्या नियोजनशून्य कारभारावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत “जनतेचा अंत पाहू नका; तातडीने यंत्रणा रस्त्यावर उतरवा” अशी मागणी करत संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर आज धडक दिली.
रविवारी पडलेल्या दमदार पावसाने दापोली तालुक्यात अनेक भागांतील वीजपुरवठा मागील चार ते पाच दिवस खंडित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दापोली भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचा आरोप करत, नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कारभारावर पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर तालुक्यातील विविध गावांमधील वीजपुरवठ्याच्या समस्या, वारंवार होणारे ट्रिपिंग, तक्रारींना विलंबाने मिळणारा प्रतिसाद, झाडांच्या फांद्या वेळेत न तोडणे आणि यंत्रणेच्या अपुऱ्या तयारीबाबत प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी भाजपाच्या दापोली तालुकाध्यक्ष सौ. जया साळवी, उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष आणि दापोली पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते, शहर अध्यक्ष अतुल गोंदकर, भाजपा मीडिया सेल प्रमुख धीरज पटेल, प्रसाद मांडवकर, बापू लिंगावळे, माजी तालुका अध्यक्ष मकरंद म्हादलेकर, ओंकार जोशी यांच्यासह जवळपास २५ ते ३० गावांतून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

महावितरण च्या ढिसाळ कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून, किरकोळ पाऊस झाला तरी तासन्तास वीज गायब होते. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. ही परिस्थिती नैसर्गिक आपत्तीपेक्षा नियोजनाच्या अभावाचे द्योतक असल्याचा आरोपही करण्यात आला.
तालुका अध्यक्ष सौ. जया साळवी यांनी अशा आपत्तीच्या काळात इतर तालुक्यातून महावितरण चे कर्मचारी बोलावून मनुष्यबळ वाढवून प्राधान्याने दापोलीची कामे करून घ्यावीत. अशा सूचना केल्या., तर पंचायत समिती सदस्य श्रीराम इदाते यांनी पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्यांना त्रासदायक ठरणारी झाडे तोडण्यासाठी महावितरणने मागवलेल्या निविदा या फारच कमी दराच्या असल्याने तालुक्यात कोणत्याच कंत्राटदाराने या निविदा भरलेल्या नसल्याच्या बाबीवर प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी उपस्थित भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फारच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. महावितरण ने केवळ स्मार्ट मीटर बसवणे आणि अंडर ग्राउंड केबलिंग याच कामांना प्राधान्य दिले असल्याची ओरड कार्यकर्ते करत होते.
यावेळी कार्यकर्त्यांची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन महावितरण प्रशासनाने पोलिसांना बोलावून घेतले. मात्र, कार्यकर्त्यांनी पोलिसांना हस्तक्षेप करण्यास मज्जाव करत आक्रमक पणे प्रश्न विचारणे चालूच ठेवले.
शासनाचे सर्वतोपरी सहकार्य मिळत असताना देखील प्रशासन कामचुकारपणा करत असल्याचे सांगून भाजप पदाधिकाऱ्यांनी जनता आता आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही. पावसाळ्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल. असा गंभीर इशारा दिला आहे. तर तालुकाध्यक्ष सौ. जया साळवी यांनी केलेल्या सुचने नुसार महावितरण च्या वरिष्ठ विभागाला फोन करून ज्यादा मनुष्यबळ देण्याच्या विनंतीला महावितरण प्रशासनाने होकार दिला आहे. उद्या सायंकाळ पर्यंत हे ज्यादा मनुष्यबळ दापोलीत दाखल होईल तेंव्हा या कामांना अधिकची गती येईल. तत्पूर्वी तालुक्यातील सत्तर टक्के भागांत विद्युत पुरवठा सुरळीत होईल. असे आश्वासन यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.












