तुये आरोग्य केंद्राबाहेर नर्सवर खुनी हल्ला

संशयीत गौतम देविदास अटकेत

पेडणे : निवृत्ती शिरोडकर

तुये येथील सामुदायिक आरोग्य केंद्राच्या परिसरात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला झाला. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी कोरगाव येथील गौतम देविदास (वय २५) याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागे प्रेमप्रकरणातून निर्माण झालेला वाद असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गौतम देविदास याच्याविरोधात यापूर्वीही संबंधित परिचारिकेला त्रास देणे, तिचा पाठलाग करणे तसेच आरोग्य केंद्राच्या परिसरात वारंवार येऊन तिच्यावर नजर ठेवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या प्रकरणीही त्याला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सोमवारी सायंकाळी संशयित तुये सामुदायिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ दबा धरून बसला होता. संबंधित परिचारिका आपली ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी बाहेर पडताच गौतमने अचानक तिच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात तिच्या डोक्यावर व हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

घटनेच्या वेळी आरोग्य केंद्र परिसरातील काही स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत गौतमला पकडून ठेवले आणि त्यानंतर पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिले. स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा संशयिताला आणखी काही वेळ मिळाला असता तर परिचारिकेचा जीव जाण्याची शक्यता नाकारता आली नसती, अशी चर्चा परिसरात होती.

गंभीर जखमी झालेल्या परिचारिकेला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी संशयित गौतम विरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, पूर्वीच्या तक्रारी तसेच आरोपीची पार्श्वभूमी यांचा सखोल तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचा हिंसक प्रकार घडल्याने कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्ड उत्तर गोवा अध्यक्ष दीपक कलंगुटकर यांनी दिली.