नाधवडेत भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; तरुण गंभीर

अपघातानंतर फरार झालेला चालक पोलिसांच्या ताब्यात

वैभववाडी प्रतिनिधी :
नाधवडे येथे भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाला गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास नाधवडे फाटा येथे घडली. चेतन परशुराम इस्वलकर (वय २५, रा. नाधवडे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर डंपरसह घटनास्थळावरून पसार झालेल्या चालकाला पोलिसांनी तत्परता दाखवत तरेळे येथे ताब्यात घेतले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणजित शिंदे (रा. कर्नाटक) हा डंपरमधून कोल्हापूरहून वाळू घेऊन तरेळेच्या दिशेने जात होता. त्याचवेळी चेतन इस्वलकर हा दुचाकीवरून वैभववाडीच्या दिशेने येत होता. नाधवडे फाटा येथे भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात चेतन इस्वलकर गंभीर जखमी झाला. मात्र, अपघातानंतर चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच तरेळे येथे बंदोबस्तावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गवस, पोलीस हवालदार बिर्जे, पोलीस नाईक खडपकर आणि पोलीस कर्मचारी सागर परब यांनी तातडीने डंपरचा पाठलाग केला. तरेळे येथे डंपरसह चालकाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वैभववाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, चालकाने मद्यप्राशन करून वाहन चालविले होते का, याची खातरजमा करण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. जखमी चेतन इस्वलकर याला नातेवाईकांनी तातडीने कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक व डंपर चालकांच्या बेदरकार वाहनचालनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा निष्काळजी व बेफाम वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.