टेरव ग्रामस्थांची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : टेरव ग्रामपंचायतीने गावातील अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या बीएसएनएल मोबाईल टॉवरचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. जुना व निरुपयोगी टॉवर तात्काळ हटवून त्याजागी अत्याधुनिक 4G/5G तंत्रज्ञानाचा नवीन टॉवर उभारून दर्जेदार नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सरपंच किशोर कदम यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बीएसएनएल टॉवर बंद असल्याने संपूर्ण गावातील मोबाईल नेटवर्क सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शासकीय अर्ज व विविध डिजिटल सेवा बाधित होत असून व्यापारी, महिला तसेच नोकरीनिमित्त बाहेर असलेल्या चाकरमान्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रिचार्ज करूनही नेटवर्क उपलब्ध नसल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत गावाचा संपर्क पूर्णपणे तुटत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या उभारलेला जुना टॉवर कोणत्याही उपयोगाचा नसून तो हटवून नवीन तंत्रज्ञानाचा टॉवर उभारण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन नवीन टॉवर बसविण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा गावातील महिला, विद्यार्थी, व्यापारी व ग्रामस्थ विद्यमान टॉवरच्या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडतील, असा इशाराही सरपंच किशोर कदम यांनी निवेदनातून दिला आहे. बंद पडलेला जुना बीएसएनएल टॉवर तात्काळ हटवावा, टेरवमध्ये नवीन 4G/5G मोबाईल टॉवर उभारावा, संपूर्ण गावात दर्जेदार मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करावी, आपत्कालीन परिस्थितीत अखंड संपर्क व्यवस्था सुनिश्चित करावी, आदी प्रमुख मागण्या टेरव ग्रामस्थांनी केल्या आहेत.













