सावंतवाडी : न्हावेली येथील धाऊसकरवाडीमध्ये विजेच्या तारांवर धोकादायकरीत्या आलेली झाडे जे.सी.बी.च्या साहाय्याने हटवून ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे संभाव्य वीजपुरवठा खंडित होण्याचा तसेच अपघाताचा धोका टळण्यास मदत झाली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या आल्याने वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत जे.सी.बी.च्या सहाय्याने झाडे व फांद्या हटविण्याचे काम हाती घेतले. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणचे वायरमन सुशांत नाईक यांना प्रत्यक्ष मदत करत काम जलदगतीने पूर्ण करण्यात सहकार्य केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, लक्ष्मण धाऊसकर, शैलेश भगत, वायरमन सुशांत नाईक तसेच धाऊसकरवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













