कांदिवलीत एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या; आरोपी तरुण ताब्यात

मुंबईतील कांदिवली परिसरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता 12 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर तरुणाने चाकूने वार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संपूर्ण कांदिवली परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. हत्येमागील कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.


एकतर्फी प्रेमातून हत्येचा आरोप; कांदिवलीत खळबळ

मुंबई : कांदिवली पूर्वेतील दामूनगर, सातारा कॅम्प परिसरात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन विद्यार्थिनीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर चाकूने अनेक वार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी इयत्ता 12 वीमध्ये शिक्षण घेत होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपी सूरज वाघमारे पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी 22 वर्षीय सूरज वाघमारे याला ताब्यात घेतले आहे. तो कांदिवलीतील दामूनगर, लहुगड येथील सरस्वती चाळीचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तांत्रिक आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीवर प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तसेच तिला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे. यापूर्वीही कुटुंबीयांनी समता नगर पोलिसांकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे.

कुटुंबीयांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत या विचाराने त्यावेळी एफआयआर दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी सुरू केली असून हत्येमागील कारण, कट आणि घटनाक्रम याचा तपास केला जात आहे. या निर्घृण हत्येने कांदिवली परिसर हादरला आहे.