संगमेश्वर तालुक्यात रणरणत्या उन्हात भातलावणी

शेतकरी हैराण

गौरव पोंक्षे माखजन
गेले पाच सहा दिवस पावसाने चक्क पाठ फिरवल्याने,शेतकऱ्यांना रणरणत्या उन्हात भात लावणी करावी लागत आहे.तालुक्यात माखजन,करजुवे,कडवई,संगमेश्वर ,साखरपा,कसबा,आरवली आदी सर्वच भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे
गेले पाच सहा दिवस पाऊसच गायब झाल्याने शेतात खडखडात झाला आहे.जमिनी वाळल्या आहेत,पाण्याचे छोटे छोटे स्रोत आटले आहेत.उन्हाचा तडाखा वाढला आहे अशी परिस्थिती असताना,भात रोप लावणी योग्य तयार झाल्याने शेतकऱ्यांना ,नाल्यांचे पाणी अडवून पंपाच्या सहाय्याने शेतात पाणी घेऊन भातलावणी लावावी लागत आहे.उन्हाच्या तडाख्यात अशी भातलावणी करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
बैल जोडी च्या सहाय्याने भातलावणी करताना बैल अक्षरशः उन्हाने धापावत आहेत.तर ट्रॅक्टर मागून फिरणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना शेतात काम करणे असह्य होत आहे.
अशा कडक उन्हातून भातलावणी प्रथमच करावी लागत असल्याचे अनेक व्ययस्कर शेतकरी सांगत आहे.काही वेळा पाऊस कमी झाल्याच्या घटनांमुळे,पंप वापरून पाणी घ्यावे लागले असले तरी,एवढा उन्हाळा आणि ऊन प्रथमच अनुभवायला मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यापेक्षा अधिक काळ, भातलावणी साठी पावसाची वाट पहात राहिलो तर भाताचे रोप जून होईल व मातीत घट्ट मुळे रुतल्याने,भात रोप तुटण्याचे प्रमाण अधिक होईल.यास्तव उन्हातान्हातून ही लगबग करावी लागत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.ज्या ठिकाणी भातलावणी पूर्ण होत आहे तिथे अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत जमीन भेदाळत आहे.यामुळे जीवाचा आटापिटा करून उन्हातून केलेली भातलावणी कितपत फलदायी ठरते हे मात्र निसर्गाच्या हातातच आहे.