आ. निलेश राणेंकडून आंबा, काजू शेतकरी आणि दशावतार कलावंतांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले

आमदार दीपक केसरकरांकडून कौतुक

​सावंतवाडी: शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सभागृहात आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसह दशावतार कलावंतांचे अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे, अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे जाहीर कौतुक केले. सावंतवाडी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध स्थानिक व राजकीय विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

​माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर एका महिलेने केलेल्या आरोपांबाबत बोलताना आमदार केसरकर म्हणाले की, जेव्हा एखादी महिला असा आरोप करते, तेव्हा तिला न्याय मिळणे आवश्यक आहे. हा कौटुंबिक आणि घरगुती विषय असल्याने मी यावर अधिक बोलणार नाही, मात्र पोलीस तपास करून त्या महिलेला नक्कीच न्याय देतील.
​सावंतवाडी नगरपरिषदेत भ्रष्टाचार नाही; टक्केवारीचे आरोप अयोग्य
नगरपरिषदेवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर विचारले असता केसरकर यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, आरोप झाल्यानंतर त्यात किती तथ्य आहे हे तपासणे गरजेचे आहे. सावंतवाडीत ठेकेदाराला कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत, अशी इथली स्वच्छ परंपरा आहे. कामात काही तांत्रिक त्रुटी राहू शकतात, पण भ्रष्टाचार होईल असे वाटत नाही. त्यामुळे टक्केवारीवरून सावंतवाडीवर आरोप करणे पूर्णपणे अयोग्य आहे. अशी चिखलफेक करण्याची संधी कोणाला मिळू नये हीच आमची अपेक्षा आहे. नगरपालिकेच्या बैठकीबाबत बोलताना, सर्व नगरसेवकांना बैठकीला बोलावणे आवश्यक होते, मात्र निरोप न मिळाल्यामुळे काही जण आले नसतील तर त्यांनाही पुन्हा विश्वासात घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

​तिलारी पाणी योजना व वीज पुरवठ्याबाबत महावितरणसोबत बैठक घेणार
दोडामार्ग-सासोली येथील पंप गृहाला पर्यायी व्यवस्था देण्याबाबत आमचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे केसरकर यांनी सांगितले. तिथे उभारण्यात येणाऱ्या नवीन सब स्टेशनच्या माध्यमातून पर्यायी वीज उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहील. तिलारीच्या या पाण्यावर परिसरातील १९ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने याकडे विशेष लक्ष दिले जाईल. तसेच घारपी परिसरालाही सुरळीत विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. या सर्व विकासकामांचा आणि वीज पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी लवकरच महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.