या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी मुख्यमंत्रीपर्यंत धडकणार,!
सिंधुनगरी : प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे येथील माजी खासदार यांच्या शुष्ना गिरीजा राऊत यांच्यावर त्यांचे सासरे, सासू, पती यांनी फार मोठा अन्याय केला आहे! याबाबत सोमवारी भाजपाच्या महिला मोर्चा ने पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक भूमिका जाहीर केली आहे! याप्रकरणी माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे चिरंजीव नगरसेवक गीतेश राऊत यांची सखोल चौकशी करावी, या प्रकरणात तिला न्याय द्यावा! अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देत पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी दिली.
भाजपा जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सरचिटणीस अदिती सावंत, अनुराधा नारकर, सुप्रिया वालावलकर, आरती पाटील यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
कोरगावकर म्हणाल्या, राज्यात महिलांच्या सन्मानासाठी विविध योजना राबवल्या जात असताना एका लोकप्रतिनिधीच्या घरातील महिलेलाच कथित छळ, अमानुष वागणूक आणि अघोरी प्रकारांना सामोरे जावे लागत असल्याचे आरोप अत्यंत धक्कादायक आहेत. न्याय मिळविण्यासाठी त्या महिलेला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असल्याची टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना या प्रकरणातील अघोरी प्रकारांच्या आरोपांची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी कोणताही राजकीय दबाव न घेता निष्पक्ष तपास करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित महिलेला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
याशिवाय जिल्ह्यात जादूटोणा, अघोरी प्रथा आणि बुवाबाजीच्या घटनांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याची मागणीही पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांवरील अन्यायाच्या प्रत्येक प्रकरणात भाजपा महिला मोर्चा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांवरही भाजपा महिला मोर्चाने निशाणा साधला. “आमच्या नेत्यांवर आरोप झाले की तातडीने प्रतिक्रिया देणाऱ्या महिला नेत्या गिरीजा राऊत प्रकरणात मात्र गप्प का आहेत?” असा थेट सवाल उपस्थित करत महिलेवरील अन्यायाच्या मुद्द्यावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन पीडितेला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले.













