माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीवरून केली होती अटक
सावंतवाडी:
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील संशयित आरोपी फिरोज बाबा याला ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. तक्रारदार महिलेने आपल्या फिर्यादीत आरोप केला आहे की, संशयित फिरोज बाबा याने तिच्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केले होते.
या तक्रारीची दखल घेत ठाणे पोलिसांचे एक विशेष पथक सावंतवाडीत दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी तातडीने सूत्रे हलवून कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेतले. अटकेनंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कारवाईबाबतची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.













