देवरूख (प्रतिनिधी):
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एन.एस.एस. व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयामध्ये डॉ. मयुरेश राणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
वाढती लोकसंख्या व त्या संदर्भात निर्माण झालेल्या विविध समस्या, लोकसंख्या नियंत्रणाचे विविध उपाय तसेच लोकसंख्या वाढीचे वास्तव याबाबत डॉ. राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. लोकसंख्या नियंत्रणाच्या अतिरेकी अंमलबजावणीचे दुष्परिणाम देखील त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्नाली झेपले यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी आकांक्षा शिवगण हिने केले, तर आभार प्रदर्शन धनश्री पर्शराम हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. सीमा कोरे, प्रा.वसंत तावडे व एन.एस.एस. विभागातील स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.













