स्वतःच्या हाताने सूर्यमालेचे मॉडेल बनवण्याची संधी
रत्नागिरी:
थोर खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी एका विशेष ‘खगोलशास्त्र कृती कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘खगोलप्रेमी रत्नागिरी’ आणि ‘आनंदालय, रत्नागिरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या सहकार्याने या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत रत्नागिरी येथील ‘श्रीमान हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण’च्या व्याख्यानकक्षात पार पडणार आहे.
पुस्तकात किंवा चित्रात दिसणारी सूर्यमाला प्रत्यक्षात किती अथांग आहे, सूर्य किती महाकाय आहे आणि ग्रह एकमेकांपासून किती अंतरावर आहेत, हे मुलांना स्वतःच्या हाताने अनुभवता यावे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये इयत्ता ४ थी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना ‘सूर्यमालेचे स्केल मॉडेल’ (Scale Model) बनवण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. केवळ कागदाचा वापर करून ग्रहांचे प्रमाणबद्ध मॉडेल तयार करणे, ग्रहांचे खरे आकार आणि त्यांमधील अंतराचे गणित सोप्या भाषेत समजून घेणे, अशा विविध रंजक गोष्टी विद्यार्थी येथे शिकणार आहेत. याशिवाय, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः तयार केलेली एक सुंदर ‘खिशातील सूर्यमाला’ (Pocket Solar System) आठवणीदाखल घरी घेऊन जाता येणार आहे.
या ३ तासांच्या कार्यशाळेसाठी अवघे ५० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून, मर्यादित जागांमुळे इच्छुकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. आपल्या पाल्याला अफाट विश्वाची सफर घडवून आणण्यासाठी आणि खगोलशास्त्राची गोडी निर्माण करण्यासाठी पालकांनी प्रा. बाबासाहेब सुतार (७७३८४५८१८५) किंवा श्रीम. स्नेहल मेस्त्री (९५२७९९४६५२) यांच्याशी संपर्क साधून आजच आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












