चिपळूण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय पंढरपूर वारी समितीच्या वतीने दरवर्षी आषाढी एकादशी वारीपूर्वी पंढरपूर येथे सायकल वारीचे नियोजन तसेच सायकलपटूंचे भव्य संमेलन आयोजित करण्यात येते. यंदा या संमेलनाचे सहावे वर्ष उत्साहात पार पडले. या निमित्ताने समितीने देशभरातील सायकलपटूंसाठी ९० दिवसांचे सायकलिंग चॅलेंज आयोजित केले होते.
या चॅलेंजमध्ये ९० दिवसांपैकी किमान ६० दिवस सायकल चालवत १००० किलोमीटरचे उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक होते. या उपक्रमाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २५०० हून अधिक सायकलपटू तसेच १३५ सायकलिंग क्लबांनी सहभाग नोंदविला. या प्रतिष्ठित चॅलेंजमध्ये चिपळूण सायकलिंग क्लबचे तब्बल ३४ सदस्य सहभागी झाले होते. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर क्लबचे अध्यक्ष श्री. प्रशांत दाभोळकर यांनी संपूर्ण स्पर्धेत मानाचा ७ वा क्रमांक पटकावत क्लबमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी ९० दिवसांच्या कालावधीमध्ये ९० दिवस सायकलिंग करून तब्बल ६४३१ किलोमीटर सायकलिंग पूर्ण करून ही उल्लेखनीय कामगिरी केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अखिल भारतीय पंढरपूर वारी समितीच्या वतीने प्रशांत दाभोळकर यांना विशेष मेडल देऊन गौरविण्यात आले. याच निमित्ताने चिपळूण ते पंढरपूर असा सुमारे २५० किलोमीटरचा सायकल वारी प्रवास पूर्ण करून ते संमेलनस्थळी पोहोचले. चिपळूण सायकलिंग क्लबचे अध्यक्ष म्हणून क्लबच्या उल्लेखनीय सहभागाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रशांत दाभोळकर यांनी हा सन्मान स्वतः स्वीकारण्याऐवजी, चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य तसेच पंढरपूर वारी चॅलेंजमध्ये टॉप २० मध्ये स्थान मिळविणारे उत्कृष्ट सायकलपटू हेमंत भोसले यांना क्लबच्या वतीने पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
महिला गटातही चिपळूण सायकलिंग क्लबने उल्लेखनीय कामगिरी केली. सौ. प्रणाली प्रशांत दाभोळकर यांनी अवघ्या ६९ दिवसांत १,६३२ किलोमीटर सायकलिंग पूर्ण करत महिला गटात ३१ वा क्रमांक मिळविला. तसेच क्लबमध्ये महिला विभागात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल त्यांचाही अखिल भारतीय पंढरपूर वारी समितीच्या वतीने विशेष मेडल देऊन सत्कार करण्यात आला. यंदाच्या चॅलेंजमध्ये चिपळूण सायकलिंग क्लबच्या अनेक सदस्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत क्लबचा नावलौकिक उंचावला. विशेष म्हणजे क्लबचे सदस्य हेमंत भोसले यांनीही संपूर्ण चॅलेंजमध्ये ८४ दिवसमध्ये ४९८२ किलोमीटर सायकलिंग करून १६ वा स्थान पटकावला तसेच सायकलपटू आशिष आयरे यांनी ८४ दिवसांमध्ये ३२७० किलोमीटर सायकलिंग करून क्लबमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केला. डॉ. सचिन खेडेकर यांनी ६७ दिवसांमध्ये २५५० किलोमीटर सायकलिंग करून क्लबमध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला. एस. आर. अंकुश जंगम यांनी ६३ दिवसांमध्ये १८४३ किलोमीटर सायकलिंग करून क्लबमध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केला. या सर्व सायकलपटूंनी चिपळूणच्या सायकलिंग परंपरेचा ठसा उमटविला.
या यशामुळे चिपळूण सायकलिंग क्लबने राज्यासह देशभरातील सायकलिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातत्य, शिस्त, फिटनेस आणि संघभावना यांच्या बळावर क्लबचे सदस्य सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत असून भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशांत दाभोळकर, सौ. प्रणाली दाभोळकर, हेमंत भोसले, आशिष आयरे, डॉ. सचिन खेडेकर, अंकुश जंगम तसेच चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सहभागी सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













