पालकमंत्री नितेश राणे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सावंत घराण्याला पुन्हा गतवैभव
‘विकासभाई – एक आश्वासक पर्व’ च्या निमित्ताने भावपूर्ण स्मरणसोहळा
कै. विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कार्यकर्तृत्वाला उजाळा
सावंतवाडी । प्रतिनिधी :“स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या मूल्याधिष्ठित नेतृत्वाचे संस्कार घेऊन विकासभाईंनी सुमारे तीन दशके शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रापर्यंत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि विधायक मार्गदर्शनाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे निर्व्यसनी, शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम जीवन आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श आहे,” असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांनी केले.
दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे भाईसाहेब सावंत यांच्या घराण्याला जिल्हा परिषद सदस्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा गतवैभव मिळाले. त्यांचे हे उपकार कधीही न विसरता येणारे आहेत, अशा शब्दात त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.
शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या विविध क्षेत्रांत आपल्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा अमिट ठसा उमटविणारे कै. विकासभाई सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ‘विकासभाई–एक आश्वासक पर्व’ या भावपूर्ण स्मरणसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विक्रांत सावंत बोलत होते.
ते म्हणाले, राज्याचे कॅबिनेट मंत्री भाईसाहेब सावंत आणि जिल्हा परिषद सभापती विकासभाई सावंत यांच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य या नात्याने मला येथील जनतेचा विकास करण्याची वारसा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मला ही संधी प्राप्त झाली असून सावंत घराण्याचा हा समृद्ध वारसा जतन करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. विकासभाईंनी उभा केलेला शैक्षणिक वटवृक्ष आज हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कारांची सावली देत आहे. मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असलो, तरी या वटवृक्षाचे खरे राखणदार संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, शालेय समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य आहेत. विकासभाईंच्या विचारांचा वारसा आणि वसा जपत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल व संस्कारक्षम करण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील.
संस्थेचे सचिव व्ही. बी. नाईक यांनी विकासभाईंच्या खंबीर नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘तुम्ही निडरपणे आणि प्रामाणिकपणे काम करा; कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,’ असा विश्वास विकासभाईंनी दिला. कोणतीही समस्या असो, तिचा कायदेशीर, प्रशासकीय आणि व्यावहारिक अंगाने अभ्यास करून ते योग्य मार्गदर्शन करीत. त्यामुळे विकासभाई म्हणजे प्रत्येक समस्येवर अभ्यासपूर्ण उपाय आणि मार्गदर्शन देणारा ‘चालता-बोलता विश्वकोश’ होते.
संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे यांनी विकासभाईंच्या संस्थेप्रती असलेल्या समर्पणाचा उल्लेख करताना सांगितले की, ते शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आणि त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठीही सातत्याने प्रयत्नशील असत. संस्थेच्या विकासकामात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्यापासून ते प्रत्येक कामाचे बारकाईने निरीक्षण करण्यापर्यंत ते स्वतः सहभागी होत. आज उभ्या असलेल्या या संस्थेच्या वाळूच्या प्रत्येक कणावर, प्रत्येक विटेवर आणि खडीच्या प्रत्येक दगडावर विकासभाईंच्या कष्टांचे आणि समर्पणाचे नाव कोरलेले आहे.
डॉ. नितीन सावंत यांनी विकासभाईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना सांगितले की, पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीला भारावून टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विकासभाई सावंत होते. शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांतील त्यांचे योगदान मोजता न येणारे आहे. सर्वसामान्य आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी दूरदृष्टीने कार्य करणारे ते खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते. त्यांचे अनपेक्षित जाणे ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर विविध क्षेत्रांची मोठी हानी आहे.
*विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव:*
स्वर्गीय विकासभाई सावंत यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा यामधील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे कु. युगा अनिल गुंजाळ, कु. कार्तिकी रामा सावंत, शुभ्रा मनोज खाडिलकर, कुमार सोहम बापूशेठ कोरगावकर, कुमार गौरांग सदाशिव सावंत, कु. कुमारी रेवा राकेश बांदेकर, कु. नमिता मिलिंद मडव, कु. मृण्मयी पाटील तर वक्तृत्व स्पर्धेत कु. जान्हवी विश्वास पाटील, कु. प्रणाली राजन घाटकर, कु. अस्मी प्रवीण मांजरेकर, कु. रेश्मा संदेश पालव, कु. प्रज्ञा तुषार मोर्ये हे विद्यार्थी बक्षिसाचे मानकरी ठरले.
या भावपूर्ण स्मरणसोहळ्यास शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, तसेच संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे, संदीप राणे, चंद्रकांत सावंत, वसुधा मुळीक, छाया सावंत, स्नेहा परब आणि डॉ. नितीन सावंत, सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, संदीप भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्य सविता माळगे, पर्यवेक्षक नामदेव मुठे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वामन ठाकूर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.












