माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली देशप्रेमाचा जागर
सावंतवाडी (प्रतिनिधी):
राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या सोमवारी, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता उपरलकर देवस्थान येथून या यात्रेचा प्रारंभ होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, विशाल परब, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, प्रसन्न देसाई, शहराध्यक्ष नगरसेवक सुधीर आरीवडेकर, सुहास गवढंळकर, रंगनाथ गवस, जिल्हा परिषद सदस्या शोभा गावडे आणि पप्पू परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात येत असून यात सावंतवाडी मतदारसंघातील माजी सैनिक, देशप्रेमी नागरिक आणि भाजपचे सर्व मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सकाळी १० वाजता उपरलकर देवस्थान येथून निघणारी ही रॅली सकाळी ११ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे पोहोचेल. या ठिकाणी माजी सैनिकांचा विशेष सन्मान केला जाणार असून भारत माता की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघेल. यात्रेनिमित्त परिसरात ५ ठिकाणी विशेष तिरंगा सेल्फी पॉईंट उभारण्यात आले असून माध्यमिक शाळांसाठी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी सांगितले की, १० ते १३ ऑगस्ट दरम्यान ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात १४ मंडळांच्या संयोजनातून पार पडणार आहे. या दरम्यान शहीद स्मारक आणि वीर स्तंभ या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून हुतात्म्यांना वंदन केले जाईल तसेच १३ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे.
उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी ही यात्रा न भूतो न भविष्यती अशी होणार असून तालुक्यातील सर्व देशप्रेमी नागरिकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.










