दोडामार्ग प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यात गुरुवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मांगेली फणसवाडी येथे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. खोक्रल ते मांगेली या महत्त्वाच्या घाट रस्त्यावर डोंगराचा मोठा भाग खचून झाडाझुडपांसह थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम करत जेसीबीड्वारे मातीचा ढिगारा हटवून दुपारपर्यंत वाहतूक पूर्ववत केली.
माती व झाडांच्या ढिगाऱ्याखाली रस्ता गाडला
गुरुवारपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपल्याने ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरड कोसळताना मोठ्या प्रमाणात लाल माती, दगड आणि झाडे रस्त्यावर आली. काही क्षणांतच संपूर्ण रस्ता माती आणि झाडांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने कोणत्याही प्रकारच्या वाहनाला पुढे जाणे अशक्य झाले होते. सुदैवाने, दरड कोसळली त्या क्षणी तिथून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
एसटी बससह अनेक वाहने अडकली
दरड कोसळल्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मांगेली येथे गेलेली एसटी बस परतीच्या प्रवासात दोडामार्गकडे येत असताना या दरडीमुळे तिथेच अडकून पडली. बसमधील प्रवाशांसह दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना तासन् तास रस्ता मोकळा होण्याची वाट पाहावी लागली. डोंगराळ भाग असल्याने नागरिकांना कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता, ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची तात्काळ धाव
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस आणि खोक्रलचे सरपंच देवेंद्र शेटकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तात्काळ तहसीलदार राहुल गुरव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता सीमा गोवेकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आणि रस्ता लवकरात लवकर खुला करण्याची मागणी केली.
दुपारनंतर वाहतूक सुरळीत
प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ जेसीबी मशीन घटनास्थळी रवाना केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील माती, दगड आणि पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम हाती घेतले. दुपारी अखेर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आल्याने प्रवाशांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला.
जेसिपी च्या सहाय्याने अशा प्रकारे रस्ता खुला करण्यात आला.










