अवघ्या १५० रुपयांत वार्षिक सवलत कार्ड; विविध बँकिंग सेवांचाही नागरिकांना लाभ
कुडाळ, :कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वार्षिक सवलत कार्ड शिबिराचे आयोजन रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एसटी महामंडळ कार्यालय, सिंधुदुर्ग राजा मैदानाजवळ, कुडाळ येथे होणार असून शहरातील सर्व नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या शिबिरात २०० रुपयांचे एसटी वार्षिक सवलत कार्ड केवळ १५० रुपयांत उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कार्डधारकांना साध्या तसेच सेमी-लक्झरी एसटी बसमध्ये १८ किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतराच्या प्रवासावर १० टक्के भाडे सवलत मिळणार आहे. तसेच कार्डधारकास एसटी अपघातात अतिरिक्त अपघाती विमा संरक्षणाचाही लाभ मिळणार असून, वार्षिक कार्ड असल्यामुळे प्रत्येक वेळी तिकीट सवलतीसाठी स्वतंत्र प्रक्रिया करण्याची आवश्यकता भासणार नाही.
याच शिबिरात रोख रक्कम काढणे, वीज बिल भरणा व मोबाईल रिचार्ज, एअर, रेल्वे व हॉटेल बुकिंग, ई-चलान भरणा, मनी ट्रान्सफर, इन्शुरन्स, फास्टॅग आणि विविध प्रकारच्या लोन पेमेंट्स अशा डिजिटल व बँकिंग सेवाही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हे विशेष शिबिर शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












