दोडामार्ग-आयी मार्गावर मोठे झाड पडून वाहतूक ठप्प; नगरपंचायत व स्थानिकांच्या तत्परतेने रस्ता पूर्ववत

​दोडामार्ग:
दोडामार्ग-आयी मार्गावरील कसई-दोडामार्ग वसतिगृहाजवळ रविवारी सकाळी एक भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड मध्यभागी पडल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, नगरपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काही वेळातच हे झाड बाजूला करण्यात आले आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

​सकाळी अचानक हे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने मार्गावरील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संकेत गायकवाड, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, उपनगराध्यक्ष देविदास गवस आणि नगरसेवक समीर रेडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

​नगरपंचायत कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून रस्त्यावरील झाड कापून बाजूला करण्यात आले. सुमारे काही तासांच्या प्रयत्नांनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.