हॉटेल व्यवसायात जोग कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे पुढचे पाऊल

 

‘आहार’ नंतर लंच अँड डिनर ची ‘मेजवानी’

रत्नागिरी शहरातील जुना माळनाका परिसरात असलेले जोग कुटुंबीयांचे आहार रेस्टॉरंट आता 62 वर्षाचे झाले आहे. जोग कुटुंबियांच्या दोन पिढ्यांनी या एका छोट्या खानावळीचे रूपांतर आहार रेस्टॉरंट मध्ये केले. आता जोग कुटुंबीयांची तिसरी पिढी तेजराज जोग हे या व्यवसायात पुढचे पाऊल टाकत असून रत्नागिरी शहरातील मनिषा टायपिंग सेंटर, मुरलीधर मंदिर नजीक, बंदर रोड येथे दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी ‘मेजवानी लंच अँड डिनर’ सुरू करत आहेत. महाराष्ट्रीयन, पंजाबी, तंदूर, चायनीज असे प्युअर व्हेज जेवण इथे उपलब्ध होणार असून चोखंदळ खवय्यांची रुची जपण्यासाठी सज्ज झाले आहे.

‘आहार म्हणजे आधार’ अशी ओळख असलेल्या जोग कुटुंबियांचे रत्नागिरी शहरातील माळनाका येथील आहार रेस्टॉरंट गेली 62 वर्ष अखंडपणे रत्नागिरीकरांची, नोकरदार, विद्यार्थी, एसटी कर्मचारी यांची चव जपत आले आहे. रत्नागिरीतील आणि रत्नागिरी बाहेरच्या हजारो लोकांनी इथून बाहेर पडताना तृप्तीची ढेकर देत इथल्या सेवेची पोच पावती दिली आहे. श्रीराम उर्फ (बाळूअप्पा) विठ्ठल जोग हे साधारणपणे 1960 च्या दरम्यान पोटापाण्याचा व्यवसाय करण्यासाठी कुटुंबासह रत्नागिरीत आले. हातात फारसं भांडवल नसताना काहीतरी करून दाखवायचे जिद्दीने आणि सोबत पितृतुल्य वडील बंधू कै. माधव विठ्ठल जोग यांच्या आशीर्वादाने आणि पाठबळाने त्यांनी रत्नागिरीत आल्यावर जुनामाळनाका येथे आजगावकर परिवाराची जागा राहण्यासाठी आणि व्यवसायासाठी भाड्याने घेतली. सुरुवातीला त्यांनी आईस कँडी करण्याचा व्यवसाय सुरू केला पण हा व्यवसाय मोसमी असल्याने व्यवसायात श्रीराम जोग यांना फारसं यश आलं नाही. त्याचवेळी रत्नागिरी शहरातील माळनाका हा परिसर हळूहळू विकसित होत होता. एसटी डेपो, डीएड कॉलेज आणि पॉलीटेक्निक नव्याने सुरू होत होतं. रत्नागिरीत बाहेरून येऊन राहण्याची संख्या हळूहळू वाढत होती. अशावेळी या बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी, शिक्षक आणि नोकरदारांच्या समोर जेवणाचा आणि नाश्त्याचा प्रश्न नेहमीच उभा राहत असे. ही गरज ओळखून बाळूअप्पा जोग यांनी 4 एप्रिल 1962 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आहार रेस्टोरंट सुरू केलं. जोग यांच्याकडील घरगुती चव असलेलं उत्तम जेवण हळूहळू लोकप्रिय झालं. खानावळीमध्ये सदस्यांची संख्या वाढू लागली. त्यानंतर चहा, बटाटेवडे, मिसळ अशी नाष्ट्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र सन 2004 पर्यंत दुपारचं जेवण आणि दिवसभर नाष्टा इतकच या आहार हॉटेलमध्ये उपलब्ध होत असे.

मात्र 2004 मध्ये बाळू अप्पा जोग यांचे सुपुत्र अभय जोग यांनी या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. अभय जोग हे खरंतर कलावंत. उत्तम चित्रकार, गायक, हार्मोनियम वादक आहेत. त्यांना हा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. मात्र ज्याप्रमाणे वडिलांनी व्यवसायाकडे लक्ष दिल त्याचप्रमाणे अभय जोग यांनी सुद्धा व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि काळानुरूप उत्तम बदल सुद्धा केले. त्यामुळे आहार उपहारगृहाच रूपांतर आहार रेस्टॉरंट मध्ये झालं. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन आणि साउथ इंडियन असे वेगवेगळे पदार्थ येथे मिळू लागले. हा बदल खवय्यानी आनंदाने स्वीकारला. जसं आहार हे रेस्टॉरंट म्हणजे खवय्यांसाठी हक्काचं स्थान बनलय त्याचप्रमाणे आता जोग कुटुंबीयांची तिसऱ्या पिढीने तेजराज जोग यांच्या रूपाने या व्यवसायात प्रवेश केला असून आपले आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षणाने एलएलबी असलेले तेजराज जोग हे आता रत्नागिरी शहरातील बंदर रोड येथे ‘मेजवानी लंच डिनर’ सुरू करत आहेत.

18 ऑगस्टच्या श्रावणाच्या दुसऱ्या दिवशीच्या मुहूर्तावर हे मेजवानी प्युअर व्हेज सुरू होत आहे. वातानूकुलीत वातावरणात उच्च दर्जाचं खाणं, निवांतपणा, मुबलक पार्किंग इथे उपलब्ध होणार आहे. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन, तंदूर अशा प्रकारचं प्युअर व्हेज जेवण इथे उपलब्ध होणार आहे. उत्तम चव ही जोग कुटुंबीयांची खासियत आहे. ती उत्तम चव ‘मेजवानी’ मध्ये सुद्धा सांभाळली जाणार आहे. रत्नागिरीकरांना नेमकं काय खायला आवडतं याची अचूक नस जोग कुटुंबीयांनी तब्बल 62 वर्षांपूर्वीच ओळखली असल्यामुळे आता तिच खाद्य संस्कृती पुढे नेत रत्नागिरीकरांना नेमके काय हवे हे जाणत ‘मेजवानी प्युअर व्हेज’ मोठ्या दिमाखात उभे राहत आहे. रत्नागिरीकरांना उत्तम जेवणासाठी ‘मेजवानी प्युअर व्हेज’ चांगला पर्याय राहणार आहे.

तेजराज यांनी वकिलीचे शिक्षण घेतले असले तरी त्यांना पहिल्यापासूनच व्यवसायात रुची होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेले पाच वर्ष ते वडिलांच्या हाताखाली आहार रेस्टोरंट येथे सक्रिय होते. सौ. अमृता अभय जोग आणि अभय श्रीराम जोग यांनी गेली 20 वर्ष आहार रेस्टोरंट अत्यंत जबाबदारीने आणि मेहनतीने सांभाळले. आता दोघांनीही त्यांचा सुपुत्र तेजराज याला याच व्यवसायात पुढंच पाऊल टाकण्यासाठी बळ दिलं आहे. तर तेजराज यांचे नात्याने आजोबा लागणारे विनायक दत्तात्रय काणे आणि कुटुंबियांनी तेजराज यांच्या या नव्या वाटचालसाठी जागा उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले आहे. तेजराज यांची पत्नी ऋचा जोग या एम. कॉम असून सीएची परीक्षा देत आहेत. त्यामुळे व्यवसायाची अकाउंट्सची बाजू भविष्यात त्या सक्षमपणे सांभाळू शकतील हे निश्चित! तेजराज अभय जोग यांनी रत्नागिरीकरांना उत्तम रुचकर ‘मेजवानी’ देण्याचं शिवधनुष्य उचलले आहे. 18 ऑगस्ट ला सकाळी 10.30 वाजता जागामालक विनायक काणे यांच्या हस्ते मेजवानी लंच अँड डिनर चे उदघाट्न होत आहे. या नव्या व्यवसायासाठी तेजराज अभय जोग यांना त्यांचे आजोबा कै. श्रीराम विठ्ठल जोग, आजी कै. अलका श्रीराम जोग यांची पुण्याई आणि आशीर्वाद, आई वडिलांचे पाठबळ आणि पत्नीची साथ आहे. त्याचबरोबर अनेक व्यवसाय बंधू, हितचिंतक आणि ग्राहक यांच्या शुभेच्छा, कामगारांची साथ त्यांना या नव्या व्यवसायात निश्चितच बळ देणार आहेत.

– अनघा निकम – मगदूम, रत्नागिरी