अध्यक्षा ज्योती देसाई यांसह कार्यकारणी चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
वेंगुर्ले : दाजी नाईक
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांचा सन २०२६–२७ या वर्षासाठीचा पदग्रहण सोहळा साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. नूतन अध्यक्षा सौ. ज्योती देसाई यांनी पदभार स्वीकारला. यावेळी इन्स्टॉलिंग ऑफिसर पी.डी.सी. डॉ. सायली प्रभू यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून सेवाभाव, मैत्री आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत इनरव्हीलच्या कार्याला अधिक गतिमान करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, इनरव्हील प्रार्थना आणि मान्यवरांच्या स्वागताने झाली. इन्स्टॉलिंग ऑफिसर पी.डी.सी. डॉ. सायली प्रभू यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी मावळत्या अध्यक्षा सौ. अपर्णा बोवलेकर यांनी सन २०२५–२०२६ मधील आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचा अहवाल सादर केला. यावेळी अध्यक्षा सौ. ज्योती देसाई यांनी पदभार स्वीकारला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी “Grow & Flourish” या वर्षाच्या थीमनुसार महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण आणि सेवाभावी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. याप्रसंगी उपाध्यक्षा सौ. सई चव्हाण, सचिव श्रीया परब, खजिनदार सौ. वृंदा गवंडळकर, आयएसओ श्रीमती गौरी मराठे आणि संपादिका सौ. आरती गिरप यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून आय.पि.पि. अपर्णा बोवलेकर, डॉ.अफशान कौरी, डॉ. पूजा कर्पे, रसिका मटकर, आकांक्षा परब, वैभवी दाभोलकर, वंदना शितोळे, अनुराधा वेर्णेकर आणि हर्षदा शिरसाट यांनी पदभार स्वीकारला.
कार्यक्रमा दरम्यान क्लबच्या स्थापनेपासून आजपर्यंत सर्व सदस्यांना एकत्रित ठेवून, आपुलकीचे वातावरण निर्माण करत क्लबचे कामकाज शिस्तबद्ध व यशस्वीपणे चालविण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल सौ. वृंदा गवंडळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या समर्पित सेवाभाव, नेतृत्व आणि क्लबप्रती असलेल्या निष्ठेबद्दल उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक कौतुक केले. तसेच कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना भेटवस्तूंचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास साईकृपा दिव्यांग शक्ती संस्था, कसालचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे, साहस प्रतिष्ठान, वेंगुर्लाच्या अध्यक्षा सौ. रूपाली पाटील, तसेच लीनेस क्लब सदस्य, इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या सदस्यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी मराठे यांनी केले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली आगामी वर्षात विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व महिला सक्षमीकरणाचे उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.













