विद्यार्थ्यांची २५ हजारांची उलाढाल; सभापती मिलिंद नाईक यांच्यासह मान्यवरांकडून उपक्रमाचे कौतुक
स्वप्निल कदम -कुडाळ : विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनपद्धती, पारंपरिक खाद्यसंस्कृती, स्थानिक उत्पादनांचे महत्त्व तसेच खरेदी-विक्री, विपणन आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर व प्राथमिक शाळा नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २२ जुलै रोजी शाळेच्या परिसरात ‘गावठी बाजार’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या गावठी बाजारात विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून तसेच परिसरातून आणलेल्या विविध पारंपरिक व स्थानिक वस्तू विक्रीसाठी मांडल्या. यामध्ये दुर्मिळ व गावरान भाज्या, कारटोली, कुरळ्या, मक्याची कणसे, नारळ, पपई, विविध प्रकारचे घरगुती मसाले, गावठी पोहे, लाडू, खोबऱ्याच्या चुनकापे, दूध, ताक, दही, लस्सी तसेच घरगुती पद्धतीने हाताने तयार केलेल्या विविध शोभिवंत वस्तू, पाट, अंबाडे आदी वस्तूंचा समावेश होता.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष खरेदी-विक्रीचा अनुभव मिळाला. वस्तूंची आकर्षक मांडणी करणे, योग्य किंमत निश्चित करणे, ग्राहकांशी संवाद साधणे, व्यवहार करणे आणि बाजारपेठेचे नियोजन करणे याबाबत विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले. या गावठी बाजारातून विद्यार्थी व ग्राहक यांच्यात सुमारे २५ हजार रुपयांची उलाढाल झाली.
या उपक्रमाला पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावस्कर, पंचायत समिती सदस्य अर्चना भंगे, पंचायत समिती सदस्य प्राची नाईक आणि नेरूर गावच्या सरपंच भक्ती घाडीगावकर यांनी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध वस्तूंची पाहणी करून त्यांच्या उपक्रमशीलतेचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्थानिक व पारंपरिक वस्तूंचे पालक आणि ग्रामस्थांनीही विशेष कौतुक केले. ‘विपणन व्यवस्था कशी असावी, व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत आणि ग्राहकांशी संवाद कसा साधावा,’ यांसारख्या विविध व्यावहारिक बाबींचे प्रत्यक्ष शिक्षण विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाले.
या उपक्रमासाठी अमित परब यांनी टेबल उपलब्ध करून देत विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या वस्तू व्यवस्थितपणे मांडून विक्री करता आली.
या अभिनव उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीती नाईक यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी योग्य नियोजन व परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला.
ग्रामीण संस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देतानाच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रुजविणारा ‘गावठी बाजार’ हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरला.













