सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडून शासनाचे आभार
सावंतवाडी । प्रतिनिधी :राज्याचे सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी क्षेत्रातील विविध प्रश्न आणि धोरणात्मक विषयांवर नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस सहकार सचिव श्री. प्रविणजी दराडे, सहकार आयुक्त श्री. दिपकजी तावरे तसेच अप्पर सचिव श्री. संतोषजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री श्री. विवेक जुगादे यांनी सहकारी पतसंस्थांच्या विविध महत्त्वाच्या मागण्या आणि अडचणी शासनासमोर मांडल्या. या सर्व मुद्द्यांवर सहकार मंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त व अप्पर सचिव यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत अनेक विषयांवर त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, तर काही मागण्यांबाबत तात्काळ निर्णयही घेण्यात आले.
या बैठकीत पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासन स्तरावर जलद गतीने पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रतीठेव शंभर रुपयांसाठी दहा पैसे दराबाबत निश्चितीकरण होत नव्हते, त्या दृष्टीने पतसंस्थांचे वर्गीकरण ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा सदरात करून ठेव संरक्षण अंशदानाचे दर निश्चित करण्यावर चर्चा झाली. लागू करण्यात आलेल्या अंशदान प्रणालीवर फेरविचार करून ती “Risk Based Premium” पद्धतीने लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असून संस्थांच्या वर्गवारीनुसार अंशदान निश्चित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.
तसेच पतसंस्थांसमोरील कर्ज वसुलीची समस्या लक्षात घेता कलम १०१ चे दाखले त्वरित उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कलम १५६ अंतर्गत अधिकारांचा कालावधी तीन वर्षे करण्याचा आणि अपसेट प्राईसची मुदत एक वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्ज वसुली प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलिस प्रशासन यांच्यात समन्वय साधला जाणार आहे. याशिवाय पतसंस्थांच्या शाखा विस्तार व कार्यक्षेत्र वाढीची परवानगी प्रक्रिया सुलभ व जलद केली जाईल, तसेच नवीन ‘मॉडेल उपविधी’ना तातडीने मंजुरी देण्यात येणार आहे. नियामक मंडळ अधिक सक्षम करून पतसंस्थांच्या व्यापक विकासासाठी प्रभावीपणे कार्य केले जाईल आणि राज्यातील पगारदार व नोकरदार पतसंस्थांच्या समस्यांवर जलद तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
सहकार भारतीने मांडलेल्या या सर्व मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडी चे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या वतीने सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील, सहकार सचिव श्री. प्रविणजी दराडे, सहकार आयुक्त श्री. दिपकजी तावरे आणि अप्पर सचिव श्री. संतोषजी पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सहकार भारतीच्या पदाधिकाऱ्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.













