शेताच्या बांधावर जात शेतकऱ्यांना खत वाटप
सावंतवाडी : शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा सह्याद्रीच्या आंबोली-चौकुळ पट्ट्यातील तरुण, तडफदार नेतृत्व दिनेश गावडे यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्यावर राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मिळालेल्या या भरभरून प्रेमाने दिनेश गावडे भारावून गेले.
दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव दिनेश गावडे यांना वाढदिवसानिमित्त आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सभापती सुष्मिता जाधव, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, आंबोलीचे माजी सरपंच जगन्नाथ गावडे, माजी सरपंच सुनिल नार्वेकर, दादा नाटलेकर, आनंद गावडे, बबन गावडे, यश गावडे, देवरथ राऊळ यांच्यासह सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच आणि कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून व संपर्क साधून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
थेट बांधावर खत वितरण उपक्रम लक्षवेधी वाढदिवसाचे औचित्य साधून दिनेश गावडे यांनी चौकुळ गावातील शेतकऱ्यांना खत वितरण केले. केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता त्यांनी घरोघरी जात आणि थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना खताचे वाटप केले. आपला लोकप्रतिनिधी आणि युवा नेता थेट शेतात येऊन पाठीशी उभा राहिल्याचे पाहून शेतकरी वर्ग भारावून गेला. याप्रसंगी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी दिनेश गावडे यांना उदंड आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.














