एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणारा सराईत आरोपी रत्नागिरीत जेरबंद; ३४ विविध बँकांची एटीएम कार्डे जप्त

रत्नागिरी : एटीएम कार्ड अॅक्टिव्ह करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली असून त्याच्याकडून विविध बँकांची तब्बल ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली आहेत. गुजरातमधील सुरत येथील धीरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र व गुजरातमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला २१ जुलै रोजी रत्नागिरीतील विश्वनगर परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात नवीन एटीएम कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एटीएममध्ये उपस्थित असलेल्या आरोपीने स्वतःचे पैसे निघत नसल्याचे नाटक करत महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने महिलेचे एटीएम कार्ड हातात घेऊन मोबाईलवर आलेल्या ओटीपीच्या मदतीने कार्ड अॅक्टिव्ह केले. मात्र, हातचलाखी करून महिलेचे मूळ कार्ड स्वतःकडे ठेवत दुसरे एटीएम कार्ड त्यांच्या हाती दिले आणि सर्व्हर बंद असल्याने कार्ड अॅक्टिव्ह झाले नसल्याचे सांगून तेथून पसार झाला. काही वेळाने महिलेच्या खात्यातून रक्कम काढल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मंडवी परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून फिर्यादीचे एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत आरोपी राहत असलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता विविध बँकांची एकूण ३४ एटीएम कार्डे हस्तगत करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपी धीरजकुमार पांचाळ याच्याविरोधात गुजरात व महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक, विश्वासघात आणि इतर गुन्ह्यांची नोंद असल्याचेही उघड झाले. न्यायालयात हजर केले असता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.