दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू
*पन्हाळा प्रतिनिधी : प्रतापसिंह काळे*

कोल्हापूर–गगनबावडा महामार्गावरील कुडित्रे फाटा येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रामचंद्र पांडुरंग आळवेकर (वय ५५, रा. तांदळवाडी, ता. पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामचंद्र आळवेकर हे घरगुती गॅस सिलेंडर घेऊन दुचाकीवरून आपल्या गावी जात असताना कुडित्रे फाटा परिसरात त्यांचा अपघात झाला. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जात असून, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
अपघातात त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. अपघाताचे नेमके कारण, अज्ञात वाहनाचा सहभाग होता का, तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
मृत रामचंद्र आळवेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने तांदळवाडी गावावर शोककळा पसरली आहे.












