लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोडूसर कंपनीतर्फे १४ हजार काजू रोपांचे मोफत वाटप

शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने कंपनीचा उपक्रम

संतोष कोत्रे
लांजा -: लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तर्फे लांजा तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांना १४ हजार काजू रोपांचे बुधवारी लांजा येथे मोफत वाटप करण्यात आले.
काजू हे कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असून लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या दहा हजार कंपन्या स्थापन करण्याच्या सेक्टर स्कीम योजनेअंतर्गत लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे .गेल्या पाच वर्षांपासून ही कंपनी कार्यरत आहे.
यावर्षी बुधवारी २५ जुलै रोजी लांजा येथे झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील ११५ शेतकरी बांधवांना १४ हजार काजू रोपांचे (वेंगुर्ला ४ आणि ७) यांचे वाटप करण्यात आले. या मोफत काजू रोपे वाटप उपक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उस्फूर्त असा प्रतिसाद दिला. मोफत काजू वाटप रोपे लागवडीसाठी प्रचार आणि कागदपत्रे गोळा करण्याचे काम कंपनीचे संचालक गणेश खानविलकर आणि अध्यक्ष आनंद कांबळे यांनी मेहनत घेऊन केले .
लांजा तालुका कॅश्यु फार्मर्स कंपनीला टेक्निकल मार्गदर्शन आणि सहकार्य टेक्नो सर्वे कंपनी करत असत असल्याने त्यांचे आभार मानण्यात आले तर दिगंज स्वराज्य संस्थेने ही काजू रोपे उपलब्ध करून दिली त्यांनाही धन्यवाद देण्यात आले. दरम्यान लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी, ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवून अनेक उद्योग उभारून रोजगार निर्मिती करण्यासाठी या कंपनीचे सभासद होऊन या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केले आहे.