चिपळूण (प्रतिनिधी) : विभा अरविंद ग्रंथालय, चिपळूण येथे शुक्रवार दि. २४ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रंथालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेसह त्यांच्या लिखित व त्यांच्यावरील विविध ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
यावेळी प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी टिळकांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच संचालक मंडळातील सदस्यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रकार्याचा, सामाजिक योगदानाचा व प्रेरणादायी जीवनचरित्राचा आढावा घेतला. कार्यक्रमास ग्रंथालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे काका, अध्यक्ष बापूसाहेब काणे, उपाध्यक्षा डॉ.वैशाली जाधव, कोषाध्यक्ष विनायक ओक, कार्यवाह विजय कदम, संचालक प्रकाश गांगण, पसाद रिसबूड, विकास मेहेंदळे, सुहास चव्हाण, माधवबागचे डॉ. सोमण, राजीव कांबळी, ग्रंथपाल सौ. पूर्वा कांबळी, कु. सुप्रिया खोत उपस्थित होते. तसेच यावेळी आगामी गुरुपौर्णिमा, ग्रंथपूजन तसेच पदव्युत्तर शिक्षणात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे नियोजन करण्यात आले.
बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता विभा अरविंद ग्रंथालयात ग्रंथपूजन व गुणवंत पदव्युत्तर उमेदवारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखिका सौ. संध्या साठे-जोशी उपस्थित राहणार आहेत. या प्रेरणादायी कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, पालक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथालयाचे कार्यवाह विजय कदम यांनी केले आहे.












