उपनगराध्यक्ष विनय गुरव यांचे आमदार किरण सामंत यांना निवेदन
सिग्नल, स्पीड कॅमेरा व पुलाची मागणी
राजापूर प्रतिनिधी : राजापूर शहरातील एसटी डेपोसामोरील राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या ठिकाणी तातडीने विविध सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणी राजापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनय गुरव यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजापूर एसटी डेपोसमोरील राष्ट्रीय महामार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरून गुरववाडी, बंगलवाडी परिसरातील नागरिकांसह परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक आणि राजापूर अर्बन बँकेत येणाऱ्या पेन्शनधारक व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. भरधाव वाहनांमुळे या ठिकाणी अपघाताचा धोका कायम असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
एसटी डेपोसमोरील बँकांकडे जाण्यासाठी चारचाकी वाहन जाऊ शकेल असा प्रशस्त पूल उभारण्याची, जंक्शनवर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्याची तसेच जंक्शनपूर्वी वेगमर्यादा कॅमेरे बसवून भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी करण्यात या निवेदनाद्वारे गुरव यांनी केली आहे. तसेच नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामांना प्राधान्य देऊन संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रसंगी या भागातील नागरिक, रिक्षा संघटना पदाधिकारी, नगरसेवक व वाहन चालक उपस्थित होते.
याबाबत सकारात्मक व तातडीने उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही आ. सामंत यांनी दिल्याचे गुरव यांनी सांगितले.












