सावंतवाडी टर्मिनसवर मंगळूरू एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत

तब्बल १६ वर्षांच्या प्रयत्नांना यश : प्रवाशांमधून समाधान
​सावंतवाडी:
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजुरी मिळालेला मंगळूरू एक्स्प्रेसचा थांबा अखेर प्रत्यक्ष सुरू झाला असून, आज सकाळी ही गाडी प्रथमच सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. या वेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी आणि तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत गाडीचे जल्लोषात स्वागत केले.

​गाडी स्थानकात पोहोचताच रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच गाडीचे लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सुपरफास्ट एक्स्प्रेसला सावंतवाडीत थांबा मिळाल्यामुळे सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
​गेली १६ वर्षे या थांब्यासाठी प्रयत्न सुरू होते. विशेषतः गेल्या ४ वर्षांत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज मोठे यश मिळाले आहे.

​या प्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर म्हणाले, “सुपरफास्ट एक्स्प्रेसला सावंतवाडीत थांबा मिळावा यासाठी दीर्घकाळ लढा द्यावा लागला. या यशाबद्दल आम्ही रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, संबंधित मंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानतो. या स्थानकाला ‘लोकनेते मधू दंडवते टर्मिनस’ असे नाव मिळाले आहे. त्यामुळे या नावाला साजेसे आणि परिपूर्ण टर्मिनस लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून लवकरच साकार व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे.”
​या स्वागत सोहळ्याला कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि सावंतवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.