नेमळे हायस्कूलमध्ये ‘कवी आपल्या भेटीला’ उपक्रमात ‘बकुळीची फुले’ काव्यसंग्रहातील कवितांचा जागर
सावंतवाडी । प्रतिनिधी :“भविष्यात उत्तम लेखक किंवा कवी म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी समृद्ध शब्दसंपदा आणि अवांतर वाचन अत्यंत आवश्यक आहे. अवांतर वाचनाची सवय विद्यार्थ्यांना केवळ साहित्यातच नव्हे, तर पुढे स्पर्धा परीक्षांमध्येही मोठे यश मिळवून देते,” असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) सावंतवाडी अध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांनी केले. नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल आणि श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कवी आपल्या भेटीला’ या अभिनव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. प्रास्ताविक करताना सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल कांबळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये साहित्य, लेखन आणि वाचनाविषयी आवड निर्माण होऊन वाचनसंस्कृती रुजावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. यावेळी संस्थाध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या हस्ते कवी दीपक पटेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला, तर उपस्थित अन्य मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना कवितालेखनाबाबत मार्गदर्शन करताना कवी दीपक पटेकर यांनी गद्य ओळी पद्यात कशा रूपांतरित कराव्यात हे सोप्या उदाहरणांसह समजावून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “वाचाल तर वाचाल” या शिकवणीचे महत्त्व पटवून देत त्यांनी आपल्या ‘बकुळीची फुले’ या वृत्तबद्ध काव्यसंग्रहातील निसर्गकविता, जीवनाचे सार सांगणाऱ्या कविता व काही मालवणी कवितांचे बहारदार सादरीकरण केले. या उपक्रमाबद्दल त्यांनी शाळा व ग्रंथालयाचे कौतुक करत हायस्कूल व ग्रंथालयासाठी आपल्या पुस्तकांच्या प्रती भेट दिल्या.
या कार्यक्रमादरम्यान हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग, श्रावण, जंतरमंतरवरील घडामोडी व हिंदी कवितांचे सुंदर सादरीकरण केले. यामध्ये जान्हवी राऊळ, निमिष राऊळ, रोहन गावडे, रिया होडावडेकर, आर्यन कानसे, साईशा बांदेकर व फराहन कर्णेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी व्यासपीठावर संस्था सचिव पांडुरंग दळवी, प्राचार्य आर. के. राठोड, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष राजेश गुडेकर यांच्यासह महेंद्र सारंग, नेत्रा चव्हाण, नितीन धामापूरकर, चंद्रकांत वंगाळ, नूतन कडावलकर, क्रांती मयेकर, सुषमा कासार, नेहा कोंडये, म्हाडळकर, ग्रंथपाल आरती कोरगावकर, प्रथमेश करंगुटकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार लवू जाधव यांनी मानले.













