कल्याणमध्ये पोलिस कर्मचाऱ्यावर मद्यधुंद तरुणाचा हल्ला; काठीने मारहाण, धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

# 112 वर तक्रार आल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसावर हल्ला

आरोपीला अटक; गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात एका मद्यधुंद तरुणाने पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला आरोपीने मारहाण करत काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


कल्याण : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात एक तरुण गोंधळ घालत असल्याची माहिती नागरिकांनी 112 आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानंतर पोलिस कर्मचारी गणेश भक्त घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपी राहुल तायडे याने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली.

वाद वाढल्यानंतर आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून कानशिलात मारले तसेच ठोसे मारत मारहाण केली. यानंतर त्याने काठीने डोक्यावर वार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हात आडवा केल्याने मोठी दुर्घटना टळली. या झटापटीत त्यांना दुखापत झाली असून त्यांच्या नेमप्लेट आणि लॅनियार्डचेही नुकसान झाले.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी राहुल तायडे हा एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर खडकपाडा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलीस करत असून, हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

Source : प्रहार डिजिटल