देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथील खालची घुगवाडीतील एका ६५ वर्षीय वृध्दाचा पायाला कुऱ्हाडीचा घाव लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येथे सोमवारी सायंकाळी घडली आहे. तुकाराम गंगाराम बाईत असे मृत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम बाईत हे सोमवारी सकाळी स्वमालकीच्या गावठाण येथील जमीन जागेत असलेल्या काजुच्या झाडांना पुरण घालण्यासाठी गेले होते. काम करत असताना कुऱ्हाडीचा घाव अचानक पायावर आला. रक्तस्त्राव होवून जखम झाल्याने बाईत यांना तत्काळ देवरुख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. टाके घालून, बँन्डेज करून कुटुंबिय घरी घेवून गेले. जेवण करून झाल्यानंतर बाईत यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले.
पुन्हा त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सुत्रांनी तपासणी करून बाईत यांना मृत घोषीत केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी बाईत यांच्या पार्थिवावर शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, तुकाराम बाईत यांचा कुऱ्हाडीचा घाव लागून अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












