देवगड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसेवा सप्ताहानिमित्त आणि स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त देवगड तालुक्यातील मोंड येथे वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मोंड ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर मोंड येथील बाळासाहेब कोयंडे यांच्या सभागृहात स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अबिद नाईक म्हणाले,स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. मात्र कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी जोमाने काम करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कामाप्रती त्यांची निष्ठा आणि कार्यक्षम नेतृत्व कायम प्रेरणादायी राहील.
या कार्यक्रमास देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर, प्रांतिक सदस्य बाळासाहेब कोयंडे, जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












