देवगड / प्रतिनिधी
वाडातर येथे गोवा बनावटीची दारु गैरकायदा बिगरपरवाना चोरटा धंदा करण्याच्या उद्देशाने आपल्याजवळ बाळगल्याप्रकरणी वाडा मूळबांध येथील विरेंद्र वासुदेव जाधव (५०) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास वाडातर येथे टाकलेल्या छाप्यात तेथील कांबळी स्टोअरच्या बाजूला विरेंद्र जाधव या संशयिताकडे सुमारे १२ हजार रूपये किंमतीची गोवा बनावटी दारु गैरकायदा बिगरपरवाना आढळून आली. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार अविनाश अर्जुन ओटवणेकर यांनी दिली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज राऊत करीत आहेत.











